Tuesday, April 15, 2025
Homeमहाराष्ट्रनिरोप समारंभाचं भाषण; १२ व्या सेकंदाला बोलता-बोलता वर्षा खरात कोसळली, ती कायमचीच!

निरोप समारंभाचं भाषण; १२ व्या सेकंदाला बोलता-बोलता वर्षा खरात कोसळली, ती कायमचीच!

धाराशिव : निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वीस वर्षीय वर्षा खरात हिचा निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला.

धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने अवघ्या महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षा खरात असे मयत मुलीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.परंडा शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालयात ही घटना घडली. या घटनेने महाविद्यालयासह शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. वर्षाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वाढते ऊन आणि दगदग यांच्या त्रासाने तिला प्राण गमवावे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करताना मुलीला आली चक्कर

“आपल्या रा. गे. शिंदे कॉलेज परंडाची विद्यार्थिनी वर्षा खरात (राहणार नाडी) भाषण करत असताना तिला चक्कर आली आणि दवाखान्यात जाईपर्यंत ती मरण पावली. सर्वांनी काळजी घ्या ऊन खूप आहे, दगदग टाळा, आनंदी राहा, हे जीवन क्षणभंगूर आहे. भावपूर्ण श्रद्धांजली दीदी” अशा शब्दात नेटिझन्सनी सोशल मीडियावरुन वर्षाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वर्षाच्या भाषणात काय होतं?

प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढा जमेल तेवढा अभ्यास करत असतो… असं बोलता बोलता तिने एक विनोद केला, ज्यावर अख्खा वर्ग खळखळून हसला. त्यानंतर शिक्षकांचं कौतुक करता-करता ती जागच्या जागी कोसळली.

Most Popular